जंटलमन अजित वाडेकर

पत्रकारितेत येऊनही अजित वाडेकरशी माझा कधीकाळी संबंध येईल असे मला वाटले नव्हते. ऑस्ट्रेलियात किंवा न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या स्कोअरची 5-6 ओळींची बातमी देण्याची गोष्ट सोडली तर तरी माझा स्पोर्ट्स डेस्कशी कधी संबंध आला नाही. नामवंतांची ओळख असावी असे मला वाटत होते. मात्र, कुणाशी मुद्दाम ओळख करून घेण्याच्या भानगडीत मी कधी पडलो नाही. कॉलेजात असतानापासूनच्या काळात अजित वाडेकरचं बॅटिंग मला आवडत असे. कधीकधी तो चेंडू अलगद झेलत असे. हे सगळं तो हे कसे करू शकतो ह्याबद्दल मला नेहमीच आश्चर्य वाटत असे. बॅटिंग, बॉलिंग आणि फील्डिंग ह्या तिन्हीतली त्याची कर्तबगारी माझा प्रिय विषय होता. अष्टपैलू अजित जेव्हा कॅप्टन झाला त्याचा मला आनंद झाला. मालिकेत इंग्लंडला हरवून त्याने भारताला विजय मिळवून दिला. पतौडीच्या काळात भारतीय किक्रेटवर पसरललेले पराभवाचे सावट ह्या विजयामुळे पुसले गेले. पुढे गाववस्कर आणि सचिन धावांचे डोंगर रचण्याचा सुवर्णकाळ सुरू झाला. भारतीय क्रिकेटच्या ह्या वाढत्या लौकिकाची सुरूवात अजित वाडेकरने करून दिली असे मला वाटते. 1971 साली इंग्लंड आणि वेस्ट इंडीजला पराभूत करून त्याने भारतीय किक्रेटच्या इतिहासात विजयाचे अक्षरशः नवे पान लिहले. व्यक्तिशः अजित वाडेकरांच्या शिरपेचात तुरा खोवला गेला!

अजित वाडेकर हा माझा आवडता खेळाडू असला तरी त्याच्याशी माझी वैयक्तिक ओळख होण्याची सूतराम शक्यता नाही हे मी ओळखून होतो. त्यामुळे त्याची माझी भेट होईल असे मला कधी स्वप्नातही वाटले नाही. पण आयुष्यात काहीवेळा असे योगायोग जुळून येतात की अगदी अनपेक्षितपणे आवडत्या व्यक्तींची भेट होण्याची संधी अवचितपणे येते. बँकेच्या बातम्यानिमित्त  हा योग अचानक जुळन आला. अजित वाडेकरांशी माझी छान ओळख झाली. ती ओळख वृध्दिंगतही झाली.

अजित वाडेकर संघाचा कॅप्टन झाला. त्याची कॅप्टन म्हणून झालेली निवड ही त्याच्या जंटलमनली स्वभाव आणि मैदानावरचा त्याचा परफॉर्मन्स पाहूनच झाली ह्याबद्दल मला खात्री वाटत होती. ह्याचे कारण क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे अशी पारंपरिक ब्रिटिश समजूत आहे. जेव्हा त्याच्याशी कामानिमित्त संबंध आला तेव्हा तो खराखुरा जंटलमन आहे ह्याचा मला अनुभव येत गेला. संघात निवड करण्यावरून खूप राजकारण चालते हे खरे. परंतु कसोटी सामन्यासाठी संघात वर्णी लागणे आणि एखाद्या सिनेमासाठी हीरो म्हणून निवड होणे ह्या दोन्ही मुळीच सोप्या नाही. हिरोची आणि क्रिकेट टीममध्ये निवड ह्या दोन्ही गोष्टी राजकारणापलीकडील आहेत असे मला अजूनही वाटते. ह्याचे कारण त्यांचा परफॉर्मन्स अक्षरशः लाखो लोक पाहात असतात. क्रिकेटपटुंच्या आणि हीरोच्या  उणिवा मुळात झाकून राहूच शकत नाही. मॅच किंवा सिनेमातील परफॉर्मन्सला लाखो लोक साक्षीदार असतात. एके काळी रेडियोवरचे धावते समालोचन ऐकताना सामन्याचे हुबेहूब चित्र उभे राहायचे.  नंतर आकाशवाणीची जागा दूरदर्शनने घेतली आणि मॅच प्रत्यक्ष पाहण्याच्या आनंदात लाखो लोक न्हाऊन निघण्याचे दिवस आले. नेमके ह्याच काळात मॅचफिक्सिंगचे प्रकार सुरू झाले. त्यामुळे क्रिकेटविश्व खूपच बदनाम झाले. क्रिकेट हा जंटलमनचा खेळ राहिला नाही!

ह्याच काळात विद्याधर गोखलेंनी मला व्यापार कॉलम दिला होता. दर मंगळवारी तो कॉलम छापून येई. त्या कॉलमसाठी अर्थ आणि उद्योग जगाविषयी चौफेर वाचन करावे लागायचे. क्वचित मी भेटीगाठीही घेत असे. ह्याच कॉलममुळे अजित वाडेकरांशी जवळिकीचे संबंध निर्माण झाले. ती हकिगत मजेशीर आहे. एकदा स्टेट बँकेत सहज चक्कर मारली तेव्हा माझे मित्र थोरात ह्यांना भेटलो. ते इकॉनॉमिक रिसर्च खात्याचे महाव्यवस्थापक होते. त्यांच्याशी गप्पा मारता मारता स्टेट बँकेच्या हायरआर्कीचा विषय निघाला. बोलण्याच्या ओघात काही अधिका-यांची नावं सांगून कोण केव्हा निवृत्त होणार ह्याचे नावानिशीवार चित्र त्यांनी उभे केले. अगदी अनपेक्षितपणे मला कॉलमसाठी सणसणीत मसाला मिळाला!

ऑफिसला येऊन भराभर सगळे लिहून काढले. देशातली सगळ्यात मोठी बँक चेअरमनच्या शोधात असा माझ्या मजकुराचा आशय होता. तो लेख वाचून स्टेट बँकेतून मला अनेकांचे फोन आले. फोन करणा-यात अजित वाडेकरांचाही फोन होता. अजित वाडेकर स्टेट बँकेच्या जनसंपर्क खात्यात उपमहासंचालक पदावर होते. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया माझ्या दृष्टीने महत्त्वाची होती. त्यांची प्रतिक्रिया अतिशय संयत होती. कुठंही वावगा शब्द त्यांनी उच्चारला नाही. त्यामुळे वाडेकरांबद्दल मला आदर निर्माण झाला. स्टेट बँक चेअरमनच्या शोधात वगैरे काही नाही. बाकी हायरआर्कीच्या तपशिलाबद्दल तुम्ही दिलेली माहिती खरी आहे, एवढं बोलून वाडेकरांनी फोन बंद केला. पण खरी मह्त्त्वाची घटना तर पुढेच घडणार होती!

लोकसत्तेतला माझा कॉलम केंद्रीय मंत्री वसंत साठे ह्यांनी वाचला आणि त्यांनी माझ्या लेखाचा सारांश पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कानावर घातला. इंदिराजींनी त्यात लक्ष घातले आणि आठवडाभरात व्ही. एन. नाडकर्णी ह्यांची नेमणूक स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी करण्याचा निर्णय घेतला. अर्थात ही माहिती मला खुद्द साठेंनीच मुंबईत आल्यानंतर प्रत्यक्ष भेटीत सांगितली. नंतर योग्य वेळी व्ही. एन नाडकर्णींच्या नेमणुकीची बातमी प्रेसट्रस्टने दिल्लीहून दिली. दोन दिवसांनी स्टेट बँकेकडून नाडकर्णींच्या फोटोसह रीतसर प्रेसनोटही आली. बातमी माझ्या टेबलावर येताच अजित वाडेकरांचा मला पुन्हा फोन आला. ‘कृपया, बातमी छापा!’  अजित वाडेकर म्हणाले. ‘अहो छापणार ना! ‘ मी लगेच आश्वासन दिले. नंतरच्या काळातहा अधुनमधून बातम्यांसाठी त्यांचे फोन येते असत.

एकदा त्यांनी चहाला निमंत्रण दिले. ते नाकारण्याचे मला कारण नव्हते. त्यांना भेटल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यांनी हळूच सांगितले, चेअरमनसाहेबांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. मी आनंदाने होकार दिला. नंतरच्या आठवड्यात चेअरमन कार्यालयाने ठरवल्यानुसार आमची भेट पार पडली.

दरवर्षी स्टेट बँकेच्या वार्षिक अहवालाची कॉपीही मला ते आठवणीने पाठवत. मीही त्यावर हमखास लिहीत असे. स्टेट बँकेच्या कामगिरीवर बातमी लिहून झाल्यावर मी सहज चक्कर मारायला म्हणून स्टेट बँकेत वाडेकरांच्या खोलीत शिरलो. गप्पा मारताना अजित वाडेकर म्हणाले, ‘आमची बँक भारतातली सर्वात मोठी बँक. परंतु मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कलकत्ता सोडले तर एकाही शहरातल्या वृत्तपत्रात स्टेट बँकेच्या कामगिरीबद्दल काहीच छापून येत नाही.’

स्टेट बँकेच्या कामगिरीची बातमी छापून येत नाही त्याचे कारण त्या इंग्रजीत असतात. आर्थिक विषयावरचे इंग्रजी अनेक पत्रकारांना समजत नाही हे मी त्यांच्या निदर्शनास आणून देताच ते म्हणाले, ‘अस्सं होय!’

क्षणभर ते विचारात पडले. तेव्हा मी त्यांना म्हटलं, मी तुम्हाला ह्यावेळी मराठीत बातमी करून देतो. तुम्ही ती सर्व वर्तमानपत्रांना पाठवा. मग बघू या आपण छापून येते की नाही ते!

त्यांना मी बातमी मराठीत करून दिली. हाताखालच्या अधिका-यांना त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या. अनेक जिल्ह्यातल्या लहान लहान वृत्तपत्रातही त्यावर्षीं स्टेट बँकेची बातमी प्रसिध्द झाली. अनेक मराठी वृत्तपत्रात बातम्या छापून आल्या तेव्हा अजित वाडेकर जाम खूश झाले.

त्यांनी मला जेवायला बोलावले तेव्हा न्यूजडेस्क सोडून त्यांच्याबरोबर हॉटेलात जाणे मला शक्य नव्हते. कारण हॉटेलमध्ये भरपूर वेळ लागणार असा मला अंदाज होता. माझी प्रामाणिक अडचण मी त्यांना सांगितली.

ते म्हणाले, ‘ठीक आहे. नाहीतरी तुम्ही कँटिनमध्ये जेवायला जाणार ना, तेव्हा तुमच्या कँटिनमध्ये जाण्यापेक्षा माझ्या केबिनमध्ये आपण स्टेट बँकेच्या कँटिनचे जेवण मागवू ! तुमचा जास्त वेळ मोडणार नाही.’

खरोखरच त्यांनी माझा वेळ मोडला नाही! आपल्या कॅटिनमध्ये त्यांनी जेवण मागवले. आम्हा दोघांचे ‘वर्किंग मिल’ मात्र साग्रसंगीत पार पडले. आणि मी वेळेत ऑफिसला परत आलो. अशी ही आमची ही वर्किंग अरेजमेंट ते रिटायर होईपर्यंत सुरू राहिली. ब्याण्णव साली मला अमेरिकेचा व्हिसा मिळाला. तेव्हा मी त्यांना माझ्या अमेरिका ट्रिपबद्दल सांगितले. त्यांनी लगेच स्टेनोला बोलावले. माझा पाहुणचार करण्याची विनंती करणारी पत्रे न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कच्या ब्रँच मॅनेजरला लिहून माझ्या सुपूर्द केली. हे सारे मला अनपेक्षित होते.

मैत्रीच्या पातळीवर निर्माण झालेले त्यांचे माझे हे संबंध त्यांनी सदैव मैत्रीच्या पातळीवर ठेवले. त्याला कधीच ऑफिशियल औपचारिकतेचा स्पर्श होऊ दिला नाही. निवृत्त झाल्यानंतर त्यांना मी एकदा भेटायलाही गेलो. त्यांनीही मोठ्या अगत्याने माझे स्वागत केले. मुंबई क्रिकेट असोशियनमधल्या निवडणुकीच्या राजकारणाचा विषय त्यांनी चुकूनही काढला नाही. तो विषय मीही कधी काढला नाही. तो विषय काढला तर मी बातमी वगैरे देणार. त्यावरून राजकारण सुरू होणार असे त्यांना वाटले असावे. ते राजकारण त्यांच्यातल्या जंटलमनला मानवले नसते. त्यांच्या मृत्यूने जंटलमन क्रिकेटपटू कायमचा तूंबूत परत गेला!

रमेश झवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *