आदरणीय वाजपेयी

देशाचे पंतप्रधानपद तीन वेळा भूषवण्याची संधी मिळूनही अहंकाराचा वारा न लागलेले  अटलबिहारी वाजपेयी हे काळाच्या पडद्याआड निघून गेले. मनुष्य हा मरणधर्मा आहे. जन्माला आलेल्या व्यक्तीला एक ना एक दिवस हे जग सोडावेच लागते. वाजपेयजींनाही असेच अखेरच्या प्रवासाला निघून जावे लागले. परंतु चार दशकांहून अधिक काळ संसदीय राजकारणावर अधिराज्य गाजवणारी त्यांची कारकीर्द लोकांच्या कायम लक्षात राहील. वाजपेयींचे नाव ‘भावी पंतप्रधान’ म्हणून लालकृष्ण आडवाणी ह्यांनी जेव्हा निःसंदिग्धपणे जाहीर केले तेव्हाच आघाडीचे का होईना, परंतु स्वतःचे सरकार स्थापन करण्याइतपत यश भाजपाला प्रथमच मिळाले ही वस्तुस्थिती आहे. हा त्यांच्या करिष्म्याचा विजय होता! वाजपेयींच्या व्यक्तमत्वाची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाली. त्यांची संघनिष्ठाही नेहमीच अविचलित होती. परंतु संघाबाहेर ते ‘मॉडरेट’ स्वयंसेवक अशी त्यांची प्रतिमा होती. ती खरीही होती. तेवढीच ती नव्हती. त्यांच्या जीवनाला त्यागाचीही पार्श्वभूमी होती. म्हणूनच संघाबरोबर त्यांना संघेतरांचाही पाठिंबा सतत मिळत राहिला.
संसदेत विरोधी पक्षनेतेपदावर असताना त्यांचे भाषण ऐकताना ही व्यक्ती देशाची पंतप्रधानपदी विराजमान झाली तर देशाच्या आयुष्याला बहर येईल असे जनतेला मनोमन वाटत होते. तो य़ोग आला पण खूप उशिरा आला. मात्र, जनता राजवटीत पंतप्रधानपदाऐवजी परराष्ट्रमंत्रीपद त्यांच्या वाट्याला आले. पराष्ट्रपद भूषवताना नेहरूंच्या परराष्ट्र धोरणात बदल करण्याजोगे काही नाहीच असे त्यांच्या ध्यानात आले. विशेष म्हणजे मुंबईत बॉम्बे युनियन जर्नालिस्टच्या वार्तालापप्रसंगी वाजपेयींनी नेहरूंचे परराष्ट्र धोरणात तितका दोष नव्हता अशी प्रांजल कबुलीही दिली. अनेक प्रसंगी पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी ह्यांच्यावर वाजपेयी टीकास्त्र सोडताना सरकारच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवत. सरकारवर टीकास्त्र सोडत असताना त्यांनी सभ्यतेच्या मर्यादा कधीच ओलांडल्या नाही. भारत-पाकिस्तान युध्दात विजय मिळवून बांगला देशास जन्माला घालणा-या इंदिराजींना ‘दूर्गा’ असे संबोधताना त्यांना ना संकोच वाटला, ना पक्ष किंवा संघ परिवारास काय वाटेल ह्याची त्यांनी क्षिती बाळगली!
प्रतिपक्षाच्या नेत्यांवर राजकारण्यांना टीका करावीच लागते. कधी कधी प्रतिपक्षाच्या नेत्यांचे वाभाडे काढताना त्या नेत्याच्या एखाद्या कृतीचा गौरव करण्याचा दिखुलासपणाही दाखवावा लागतो. मात्र, दिलखुलासपणा केवळ दाखवायचा नसतो. तो स्वभावातच असावा लागतो. वाजपेयी दिलखुलास स्वभावाचे तर होतेच; खेरीज ते संवेदनशीलही होते. विशेष म्हणजे संवेदनशीलता गमावण्याची वेळ त्यांच्यावर कधीच आली नाही. त्यांच्या अंगी असलेल्या गुणांना दाद द्यावीशी वाटली म्हणूनच तत्कालीन पंतप्रधानांनी त्यांना युनोत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. मन मोठे करून अटलजींनीही ती विनंती मान्य केली. शिष्टमंडळाचे नेते ह्या नात्याने युनोच्या आमसभेत त्यांचे प्रभावी भाषण झाल्याने जागतिक नेत्यांवर त्यांची आपसूकच छाप पडली.
गुरु मानण्यावरून पंतप्रधान चंद्रशेखरांनी काढलेल्या उद्गाराच्या संदर्भात ‘गुरु’ आणि ‘गुरुघंटाल’ ह्या दोन शब्दातला फरक वाजपेयींनी सहज जाता जाता स्पष्ट केला. त्यावेळी त्यांच्यातले जातीवंत लेखकाचे भाषाप्रभुत्व दिसले. वार्ताहर परिषद असो वा जाहीर सभा, पक्षाच्या कार्यकारिणीची मंथन बैठक असो वा भेटीस आलेल्या पक्षाच्या शिष्टमंडळापुढे बोलण्याचा प्रसंग असो, हजरजबाबीपणा हा त्यांचा गुण हमखास प्रकट व्हायचा. एखाद्या प्रश्नाच्या गाभ्यात जाण्यासाठी लागणारी प्रखर प्रज्ञा आणि कूटनीती-प्राविण्य हे दोन्ही गुण त्यांच्यात पुरेपूर होते. सत्प्रवृत्ती हा त्यांचा स्वभावाचे अंतरंग वैशिष्ट्य होते. त्यांच्या प्रतिपादनाला विनोदाची जोड लाभली नाही असे कधी घडले नाही.
सूरत अधिवेशनात भाजपा हा पर्यायी पक्ष असला पाहिजे असे भाजपाचे ध्येयधोरण निश्चित करण्यात आले. हे धोरण आडवाणींनी ठरवले असले हे तरी ते ठरवण्याच्या बाबतीत वाजपेयींचाही मोठा वाटा होता. सत्ता संपादन करण्याचा प्रश्न आला तेव्हा तात्त्विक अडसर उभे करणा-यांना लीलया बाजूला कसे सारायचे ह्याचे कौशल्य त्यांच्या स्वभावातच होते. राज्य पातळीवरील पक्षांशी भांडत बसण्यापेक्षा त्यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे करण्याचे शहाणपण दाखवणे केव्हाही चांगले अशी त्यांची भावना होती. म्हणूनच उत्तर भारताच्या राजकारणात नेहमीच घाणेरडे वर्तन असलेल्या पक्षांशी हात मिळवणी करताना वाजपेयींनी बिल्कूल फिकीर केली नाही. ‘ हां हां, इससे हमारे सतित्व का कोई भंग नहीं हो जाता’ असे उद्गार अधिवेशन संपल्यावर झालेल्या वार्तालापप्रसंगी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी काढले होते. असे असले तरी पक्षाची प्रतिमा मलीन होणार नाही इकडे त्यांनी बारीक लक्ष ठेवले. गुजरातेत गोध्रा कांड झाल्यानंतर उसळलेल्या दंगली कठोरपणे आटोक्यात आणण्याचा सल्ला त्यांनी त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी ह्यांना दिला. तोही एका शब्दात- ‘ राजधर्म पाळा! ‘ अर्थात मोदींना राजधर्म सुनावण्याचा त्यांना नैतिक अधिकार होता. कारण, नरेंद्र मोदींना मुख्यमंत्रिपदाची संधी वाजपेयींनीच दिली होती.
धर्मयुग ह्या हिंदी साप्ताहिकात प्रसिध्द झालेल्या त्यांच्या कवितांचा संग्रह ‘मेरी एक्कावन कविताएं’ ह्या नावाने प्रसिध्द झाला. राजकारणात वावरत असताना त्यांचे ह्रदय देशप्रेमाच्या भावनेने ओथंबले होत. त्यांनी लिहीलेल्या कवितांचा संग्रह प्रसिध्द झाला आणि त्यांचे एक नवेच रूप लोकांसमोर आले. मुंबई मुक्कामात एकतरी मराठी नाटक पाहायचेच असा त्यांचा नियम होता. पाहण्यासारखे नाटक कोणते आहे हे ते विद्याधर गोखल्यांना फोन करून विचारत आणि शिवाजी मंदिरातल्या नाटकाला जात. वेदप्रकाश गोयलांच्या घरी ते मुक्काम करत. त्यवेळी त्यांना भेटायला अनेक लहानथोर मंडळी येत. भेटीस आलेल्या प्रत्येकाशी  ते अगदी सहज संवाद साधत. त्यांच्या अंगी ती एक कलाच होती. संवाद साधताना ते कुणाचीही फिरकी घेत. फिरकी घेताना त्या माणसाबद्दल त्यांचा मनात अजिबात विखार नसायचा. गंमतीचा भाग म्हणजे ज्याची फिरकी ते घेत तोही त्यांच्या हास्यविनोदात सहभागी होत असे!
विलोभनीय व्यक्तिमत्त्व लाभलेला हा असामान्य नेता केवळ भाजपाचाच नव्हता, तर तो देशाचा नेता होता. जनमानसात त्यांची आठवण कायम राहील. त्यांच्या आठवणींची फुले लोक त्यांना रोज अर्पण करत राहतील! ह्या आदरणीय नेत्यास अखेरची आदरांजली!

रमेश झवर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *