About

विनम्र अभिवादन

सव्वीस फेब्रुवारी रोजी ‘राजकारणावर मनःपूत भाष्य’ हा माझा ब्लॉग सुरू झाला. ब्लॉगला कोणते शीर्षक द्यावे हा माझ्यापुढे प्रश्न होता. शेवटी असं ठरवलं की वृत्तपत्र क्षेत्रातल्या सर्वांगिण अनुभवाची माझी स्वतःची पार्श्वभूमी लक्षात घेता संकेतस्थळाला वेगळे शीर्षक शोधत बसण्यापेक्षा माझेच नाव, रमेश झवर, देण्याचे ठरले. आता संकेतस्थळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. ह्या ब्लॉगला अपेक्षेपलीकडे प्रतिसाद मिळाला. तब्बल सतरा देशात वास्तव्य करणा-या मराठी वाचकांनी माझ्या ब्लॉगवर पसंतीची मोहर उठवली. अमेरिकेतील एकट्या कॅलिफोर्निया राज्यात तर हिटची संख्या पाचशेच्यावर गेली. थोडक्यात, जिथे जिथे मराठी वाचक तिथे तिथे माझ्या ब्लॉगला हिटस् अशी स्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे आधीच्या गुगल ब्लॉगस्पॉटवरील माझ्या htt//rgzawar.blogspot.in/ ह्या साईटवर प्रकाशित झालेले सर्व लेख www.rameshzawar.com ह्या संकेतस्थळावरील अर्काईव्हमध्ये उपलब्ध करण्यात आल्यामुळे आधीच्या सर्व लेखांनाही हिटस् प्राप्त झाले. त्याशिवाय ‘फोडिले भांडार’ ह्या सीमा घोरपडे ह्यांच्या सदरालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. गेस्ट एडिटर विश्वास ह्यांच्या ‘अनुभव’ ह्या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या लेखांनाही उदंड प्रतिसाद मिळाला. कोणत्याही राजकीय पक्षांबद्दल आकस नाही, ना पुढा-यांशी लागेबांधे! कोणाचाही मुलाहिजा न बाळगता वस्तुनिष्ठ टीका हेच माझे धोरण. त्यामुळे माझे ब्लॉगलेखन कमालीचे यशस्वी ठरले. हिटस् च्या संख्येने दहा हजाराचा आकडा केव्हा ओलांडला हे माझ्या लक्षातही आले नाही. जगभर पसरलेल्या असंख्य वाचकांच्या गुणग्राहकतेला माझे विनम्र अभिवादन!

हे संकेतस्थळ सुरू करण्याची प्रेरणा मला माझे सहकारी प्रवीण बर्दापूरकर ह्यांच्यापासून मिळाली हे मी कृतज्ञतापूर्वक नमूद करू इच्छितो. संकेतस्थस्थळाचे व्यवस्थापन करताना मला आणि माझ्या सहका-यांना कष्ट उपसावे लागले. माझे सहकारी पेजएडिटर सीमा घोरपडे, गेस्ट एडिटर विश्वास रानडे, सल्लागार मंडळाच्या अध्यक्षा ज्योती झवर आणि अन्य सभासद डॉ. विवेक कर्वे, संजय मुंदडा, सॉफ्टवेअर इंजिनियर्स सुहास झवर, निलेश लढ्ढा आणि इतर अनेकांनी अतोनात कष्ट उपसले. आगामी काळातही वाटेल तेवढे कष्ट उपसण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यांच्या ह्या आश्वासनाने मी सुखावलो. निरलसपणे कष्ट उपसणा-या ह्या माझ्या सहका-यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यावाचून राहवत नाही. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यातील चॅरलॅट येथे वास्तव्य  करणा-या व्यावसायिक वेब डिझायनर मोहना जोगळेकर ह्यांनीही मला मोलाचे मार्गदर्शन केले.

माझ्या पत्रकारितेची सुरूवात 1968 साली ‘मराठा’ दैनिकात झाली. त्या काळात हाताने खिळे जुळवून कॉपी कंपोज करण्याचं काम कंपोजझिटर मंडळी करीत असत. नाही म्हणायला ‘मराठा’कडे एक लायनो मशीनही आलं होतं. त्यानंतरच्या चाळीस वर्षांच्या काळात पत्रकारितेत खूप बदल झाले. अक्षर जुळणीपासून ते ‘पेंटिंयम 4′ संगणकावर, नंतर 500 जीबीच्या हार्ड डिस्क असलेल्या संगणकावर अक्षर जुळणी सुरू झाली. आता तर थेट वर्तमानपत्राच्या नेटवर्किंगवर पत्रकार मंडळींना बातम्या, लेख, वार्तापत्रे लिहावी लागतात.

छपाईच्या तंत्रात बदल झाले तसे वृत्त-प्रेषण आणि छायाचित्र-प्रेषण ही थेट वर्तमानपत्राच्या नेटवर्कमध्ये जाऊन पडते. संपादकीय संस्कार करून हा ताजा मजकूर लगेच चालू आवृत्तीत समावेश करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. संगणक तंत्रज्ञान आणि टेलिकॉम तंत्रज्ञान ह्यांचा अपूर्व मेळ झाला आहे. त्यामुळे ताजे वर्तमानपत्र वाचकांना सादर करण्याची सोय झाली. पण वर्तमानपत्रांची घरपोच ’डिलिव्हरी’ अजूनही पूर्णपणे ट्रक-टेंपोसारख्या वाहनांवर अवंलबून आहे. त्यावरही इंटरनेटने मात केली असून तुमच्या संगणकावर वा तुमच्या मोबाईलवर वर्तमानपत्र उपलब्ध झाले आहे. जे प्रिंटप्रेस मिडियाबद्दल तेच रेडियो-दूरचित्रवाहिन्यांबद्दल! बातम्या घडत असतानाच सॅटेलाईटवरून त्या माध्यमांच्या कार्यालयांकडे पाठवल्या जातात. आलेल्या बातम्यांचा समावेश चालू बुलेटिनमध्ये केला जातो. थोडक्यात, प्रेक्षकांना ह्या क्षणी काय घडत आहे ह्याचे साक्षात दर्शन पत्रकार घडवत आहेत. मला केवळ ह्या ‘माध्यम क्रांती’चा साक्षीदार होण्याचेच भाग्य मिळाले असे नाही तर त्यात सहभागी होता आले हे मी माझे सद्भाग्य समजतो.

गेल्या दहा वर्षात मला वृत्त चॅनेल्सवर भाष्य करण्यासाठी अनेकदा पाचारण करण्यात आले.  आकाशवाणीवरील कार्यक्रमातही मी बाईट देत असतो.  संकेतस्थळ आणि दूरचित्रवाणी ह्या दोन सर्वस्वी नव्या माध्यमांनी मला स्वीकारले! ह्या दोन्ही माध्यमांच्या वाचक-प्रेक्षकांना पुन्हा एकवार अभिवादन!